शिक्रापूर : बहुजननामा ऑनलाइन – सर्वत्र कोरोनाने थैमान घालायला सुरवात केली आहे. प्रशासनाकडून कडक निर्बंध लादण्यात आले आहे. त्याची अमंलबजाणी करण्यासाठी प्रशासन झटत आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊन काळामध्ये सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत असताना शिरूर तालुक्यात नियमांचे उल्लंघन करून बार सुरु ठेवणाऱ्या शिवसेना उपतालुका प्रमुखाचा बार शिक्रापूर पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने सील केला असल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापूर ता. शिरूर येथे लॉकडाऊन काळात नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिक व नागरिकांवर शिक्रापूर पोलीस व ग्रामपंचायत प्रशासन कारवाई करत असताना शिक्रापूर मलठण फाटा परिसरात शिवसेना उपतालुका प्रमुख आण्णासाहेब उर्फ आनंदा दामोदर हजारे यांच्या मालकीचा त्रिमूर्ती बार सुरु असून त्या ठिकाणी नागरिकांना दारू दिली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळाली.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोलीस उपनिरीक्षक शिवदास खाडे, सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सुभाष खैरे, ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे, तलाठी अविनाश जाधव, ग्रामपंचायत सदस्य रमेश थोरात, मयूर करंजे, पोलीस शिपाई संतोष शिंदे, प्रताप कांबळे, ब्रम्हा पोवार, अंबादास थोरे, अविनाश होळकर, लक्ष्मण शिरसकर यांनी त्या ठिकाणी जात पाहणी केली असता सदर बारचे शटर उघडे तसेच आतमध्ये दोन व्यक्ती दारू खरेदी करताना मिळून आले.
यावेळी शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने दोन्ही व्यक्तींना कारवाई साठी ताब्यात घेतले, तर यावेळी सदर ठिकाणचा पंचनामा करत तलाठी अविनाश जाधव व ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांनी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या उपस्थितीत सदर बार पुढील पंधरा दिवसांसाठी पूर्णपणे सील करत बारचालक शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आण्णासाहेब उर्फ आनंदा दामोदर हजारे रा. मलठण फाटा शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांच्यावर कारवाई केली आहे. कोरोनाच्या संकट काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई मध्ये कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे शिक्रापुरचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितले.