मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरु केली आहे. मात्र अद्यापही लसीबाबत अनेकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्यामुळे अनेकजण लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत. जास्तीत जास्त लोकांच लसीकरण व्हावे यासाठी केंद्राचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी जनजागृती केली जात आहे. लोकांना प्रोत्साहित केले जात आहे. आता तर मोदी सरकारनेही देशपातळीवर एक स्पर्धा सुरू केली आहे. कोरोना लस घेणाऱ्याला मोदी सरकार 5000 रुपये दरमहा देणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 31 डिसेंबर 2021 पर्यंतची मुदत आहे.
केंद्र सरकारच्या mygov.in या वेबसाईटवर लसीकरणासाठी घेतल्या जाणा-या स्पर्धेची सविस्तर माहिती दिली आहे. कोरोना लस घेणा-या प्रत्येकाला या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने लस घेतल्यानंतर फक्त एक काम करावे लागणार आहे. लस घेताना फोटो काढावा लागेल आणि त्याला लसीकरणाच महत्व सांगणारी एक छानशी टॅगलाईन द्यावी लागेल. ज्यामुळे लोकांना प्रेरणा मिळेल. यासाठी तुम्हाला mygov.in वेबसाइटवरील या लिंकवर लॉग इन करावे लागेल. यासाठी तुम्हाला mygov.in लॉग इन आयडीसह, ओटीपीमार्फत किंवा तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटमार्फतही लॉग इनची सुविधा आहे. त्याठिकाणी तुम्हाला आवश्यक ती माहिती भरून तुमची एन्ट्री पाठवायची आहे. तिथे तुमचा फोटो आणि टॅगलाइन पाठवा. सरकार या सर्व फोटो आणि टॅगलाइनमधून उत्तम असा फोटो आणि टॅगलाइनची निवड करणार आहे. यातून 10 विजेत्यांची निवड केली जाणार आहे. विजेत्यांना दरमहा 5000 रुपये दिले जाणार आहेत.