पुणे बहुजननामा ऑनलाईन – पुणे विद्यापीठातील कमवा व शिका योजनेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या डॉ. अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला अहवाल काल (मंगळवार) विद्यापीठाला सादर केला. त्यामुळे दोषींवर विद्यापीठाकडून काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
विद्यापीठातील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांना काही तास काम केल्यानंतर त्यांच्या बँकखात्यात मानधन जमा केले जाते पण, गेल्या काही वर्षापासून विद्यापीठात बोगस विद्यार्थी दाखवून मानधनाची रक्कम बेकायदा घेण्याचा प्रकार सुरु आहे.त्यातच सोमवारी पावसाळी अधिवेशनात विद्यापीठातील कमवा व शिका योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आमदारांनी केली.
त्यावर उच्च शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले.त्यामुळे विद्यापीठातर्फे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीची बैठक पार पडली. या समितीने योजनेत झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून मंगळवारी अंतिम अहवाल तयार करून विद्यापीठाला सादर केला.
काही विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांना कमवा व शिका योजनेत प्रवेश देवून त्यांच्या खात्यात रक्कम जमा करून लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात केली जात आहे. याप्रकरणातील दोषींवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.