सातारा : बहुजननामा ऑनलाइन – साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेण्याची पूर्ण तयारी भाजपने केली असून एप्रिल महिन्यात रिकाम्या होणाऱ्या जागेवर त्यांची निवड होणार आहे. तसेच केंद्रात मंत्रिपद देत दिल्लीच्या तख्ताने उदयनराजेंचे हात बळकट करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. सध्याच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीने सत्तेसोबतच राज्याच्या राजकारणात मुसंडी मारत आपली जागा बनवली असून भाजप मात्र मागे पडल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे भाजपने त्यांची ताकद पुन्हा वाढवण्याची तयारी सुरु केली आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेचे एकूण १९ खासदार असून त्यातील ७ खासदार २ एप्रिल २०२० ला रिक्त होणार असून त्यात शरद पवार, मजिद मेमन, अमर साबळे, राजकुमार धूत, हुसेन दलवाई, रामदास आठवले, संजय काकडे, यांचा समावेश आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले भाजपच्या पाठिंब्याने राज्यसभा सदस्य झाले होते. तर भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश आहे. त्यांची मुदत २ एप्रिलला संपणार असून भाजपचे दुसरे खासदार अमर साबळे यांचीही मुदत २ एप्रिललाच संपणार आहे. तर या जागांपैकी एका जागेवर उदयनराजेंना नियुक्ती दिली जाईल, अशी शक्यता आहे.
अमर साबळे यांची जागा ही रिक्त होणार असून त्यावर उदयनराजेंना संधी दिली जाऊ शकते. खासदार किरीट सोमय्या हेही राज्यसभेवर येण्यासाठी इच्छुक आहेत. पण महाराष्ट्रात भाजपची राजकीय ताकद वाढवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांना उदयनराजेंची गरज आहे. त्यामुळेच उद्यनराजेंनाच संधी दिली जाईल, अशी शक्यता दर्शविली जात आहे.