भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळ येथील एका राज्य सशस्त्र दलात (SAF) असणाऱ्या जवानाचा साखरपुडा मोडला या कारणाने माथेफिरू जवानाने थेट त्या युवतीच्या आई आणि भावावर दारू पिऊन गोळीबार केला आहे. तर या गोळीबारात युवतीच्या भावाला पोटात गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तर आईला पायाला गोळी लागल्याने तिची स्थिती ठीक आहे. आईवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जवान अजीत सिंह चौहान असे त्या आरोपीचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, अजीत सिंह चौहान हे SAF ७ व्या बटालियनचा जवान संघ कार्यालय समिधाच्या सुरक्षेसाठी तैनात होता. तरूणी आणि जवान गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्ड होते. दोघांचा साखरपुडा झाला होता. परंतु काही कारणाने हा साखरपुडा मोडला. त्या जवानाने मंगळवारी रात्री उशीरा युवतीच्या घरी आला आणि पूर्ण परिवाराला जीवे मारण्याची धमकी देत त्याने गोळ्या झाडल्या. तर या गोळीबारादरम्यान युवतीच्या कुटूंबातील इतर सदस्यही तिथे उपस्थित होते. त्यांनी आरोपीकडून रायफल हिसकावून घेतली, नाही तर त्याने आणखी काही लोकांवर गोळ्या झाडल्या असत्या. तर आरोपी जवानाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे डीआयजी इरशाद वली यांनी सांगितले आहे.
दरम्यान, युवतीच्या नातेवाईकांनी आरोपीकडून रायफल हिसकावून घेतली आणि त्याला किचनमध्ये कोंडलं. तिथे त्याने त्याची वर्दी जाळली आणि रायफलचे काडतूस ब्लास्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने एकूण १० राउंड फायर केले. तो दारूच्या नशेत होता. असे पोलिसांनी सांगितले आहे.