बहुजननामा ऑनलाइन टीम – प्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चेन्नई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याचबरोबर त्यांची कोरोना चाचणी देखील निगेटिव्ह आली आहे, अशी माहिती एस.पी. बालासुब्रमण्यम यांचा मुलगा एस.पी. चरण यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती खालावली होती. म्हणून ते लवकर बरे व्हावेत यासाठी सोशल मीडियावर चाहते प्रार्थना करत आहेत. केवळ चाहतेच नाही तर अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी देखील बालासुब्रमण्यम लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली होती. त्यात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचाही समावेश आहे. आता बालासुब्रमण्यम यांची प्रकृती स्थिर असून त्यांची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.
सध्या बालासुब्रमण्यम यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या बालासुब्रमण्यम हे 74 वर्षांचे असून त्यांनी स्वत: फेसबुकवर व्हिडीओ शेअर करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाही. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे कोरोना चाचणी करुन घेतली. तेव्हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तेव्हा डॉक्टरांनीच घरातच होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला असल्याचे त्यांनी सांगितले होते.