बहुजननामा ऑनलाइन टीम – डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंत समाधी घेणार आहेत अशी अफवा पसरल्यानंतर लातूर जिल्ह्यात मोठी गर्दी उसळली होती. मात्र शिवाचार्य महाराज आज (शुक्रवार दि 28 ऑगस्ट) समाधी घेणार नाहीत असं त्याच्या आश्रमाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
आज सकाळपासून अशी अफवा पसरत होती की, लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंत समाधी घेणार आहेत. डॉ शिवलिंग शिवाचार्य हे लिंगायत समाजाचे धर्मगुरू आहेत. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर राज्याबाहेर देखील शिवाचार्य यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
जेव्हा त्यांच्या जिवंत समाधी घेण्याची अफवा समोर आली तेव्हा त्यांना मानणारा वर्ग आणि भक्त मोठ्या संख्येत आश्रमाबाहेर गोळा झाले होते. शिवलिंग शिवाचार्य यांचं दर्शन घ्यायचं ही एकच ओढ भक्तांना लागली होती. शिवाचार्य महाराज यांचं वय 100 पेक्षा अधिक असल्याची माहिती आहे.
शिवाचार्य महाराज यांच्या अहमदपूर इथल्या भक्तीस्थळ आणि त्यांच्या आश्रमात समर्थाकांची मोठी गर्दी जमली होती. परंतु ते आज समाधी घेणार नाहीत असं आश्रमाकडून स्पष्ट करण्यात आलं.
सध्या कोरोनाचं संकट आहे. अशात सुरक्षितता बाजूला सारून भक्तजनांनी गर्दी केल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. यावेळी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा तर उडालाच, सोबतच काही भक्तांनी मास्कही लावलं नव्हतं. त्यामुळं काळजी व्यक्त केली जात आहे. लातूरमध्ये आजवर 7 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत हेही चिंतेचं आणखी एक कारण आहे.