बहुजननामा ऑनलाइन टीम – इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या भारत दौर्याची सुरुवात शानदार झाली. चेन्नईत खेळल्या जाणार्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 218 धावांची खेळी केली. यासह रुटने आपली 100 वी कसोटी अविस्मरणीय अशी बनवली. 218 धावांच्या मॅरेथॉन डावादरम्यान रूटने अनेक विक्रम नोंदवले. 100व्या कसोटी सामन्यात दुहेरी शतक ठोकणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
पहिल्या दिवशी 128 धावा करून नाबाद राहिलेल्या रूटने आपला डाव पुढे सरकवत दुसऱ्या दिवशी लंच नंतर 341 चेंडूत आपले दुहेरी शतक पूर्ण केले. डावाच्या 143 व्या षटकातील रविचंद्रन अश्विनच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार मारत रूटने दुहेरी शतक पूर्ण केले. हे त्याच्या कारकिर्दीतील पाचवे दुहेरी शतक आहे. शेवटच्या तीन कसोटी सामन्यात रूटने दुसऱ्यांदा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी त्याने श्रीलंकेत श्रीलंकेविरुद्ध दुहेरी शतक झळकावले होते.
मोडला इंझमाम उल हकचा विक्रम
जो रुटच्या नावावर 100व्या कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही नोंदविला गेला आहे. त्याने पाकिस्तानच्या इंझमाम उल हकचा विक्रम मोडला. इंझमामने 2004-05 मध्ये भारताविरुद्ध बंगळुरूमध्ये आपल्या 100व्या कसोटी सामन्यात 184 धावा केल्या होत्या.
डॉन ब्रॅडमनची केली बरोबरी
कसोटी सामन्यांमध्ये रूटची ही सलग तिसऱ्यांदा 150 वा त्यापेक्षा अधिकची खेळी होती. तो सलग 150 प्लस स्कोअर करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी श्रीलंकेमध्ये दोन कसोटी सामन्यांमध्ये रुटने 228 आणि 186 धावांची खेळी केली होती. सलग सर्वाधिक 150 प्लस स्कोअरचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर आहे. त्यांनी 2007 मध्ये सलग 4 वेळा 150 प्लसचा स्कोअर बनवला होता. दुसऱ्या क्रमांकावर विली हॅमंड (1928-29) आहेत. त्यांनी 3 वेळा हा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर महान फलंदाज डॉन ब्रॅडमन, पाकिस्तानचे माजी कर्णधार झहीर अब्बास, मुदस्सर नजर आणि न्यूझीलंडचे टॉम लाथम (2018-19) यांनीही 3-3 वेळा अशी कामगिरी केली आहे.
रूटच्या नावावर हे देखील विक्रम
जो रूट आपल्या कारकीर्दीतील 98व्या, 99व्या आणि 100व्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी जो रूटने श्रीलंकेत खेळलेल्या 98व्या आणि 99व्या कसोटी सामन्यात शतके ठोकली होती. याशिवाय 100व्या कसोटीत शतक झळकावणारा रूट इंग्लंडचा तिसरा खेळाडू आहे तर रूटच्या आधी इंग्लंडच्या कॉलिन काउड्रे आणि अॅलेक स्टीवर्टने अशी कामगिरी केली आहे.