खासगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा डाव

March 22, 2019
कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून घटनेच्या माध्यमातून मागासवर्गीयांना शिक्षण आणि आरक्षण मिळाले. यातून मागासवर्गीयांचा विकास झाला. मात्र, खासगीकरणाच्या माध्यमातून ते संपवण्याचा डाव सरकारकडून सुरू आहे,’ असा आरोप अर्थतज्ज्ञ व विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी केला. कोल्हापूर येथील माणगाव परिषदेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त माणगाव परिषद शताब्दी महोत्सव समितीने आयोजित केलेल्या समारंभात ‘दलित वंचित समाजाची स्थिती आणि पुढील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी संध्याकाळी कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलताना डॉ. थोरात म्हणाले, ‘केवळ ३३ टक्के लोकसंख्या असलेल्या उच्चवर्णीयांकडे ६६ टक्के जमीन आहे. उद्योग, पतपुरवठा संस्थांमध्येही उच्चवर्णीयांचेच प्राबल्य आहे. मागासवर्गीयांकडे केवळ चार टक्के जमीन आहे, तर उद्योगांमध्ये हा टक्का आणखी कमी आहे. उत्पन्नाचे निश्चित साधनच नसल्याने मागासवर्गीय आर्थिक दुर्बल राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सामाजिक जागृतीमुळे मागासवर्गीय समाज शिक्षणाकडे वळले, तर त्यांनीच दिलेल्या आरक्षणाच्या घटनादत्त अधिकारामुळे नोकऱ्या मिळाल्या. यातून आजचा नवा मध्यमवर्ग दिसत आहे. या समाजाची गेल्या ३० ते ४० वर्षातील विकासाची गती यापुढे दिसणार नाही.’
डॉ. थोरात यांनी वेगवेगळ्या अहवालांचा आधार देत मागासवर्गीयांची सध्यस्थिती काय आहे याची माहिती दिली. यापुढील आव्हानांबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘मागासवर्गीयांना मिळालेल्या अधिकारांपासून वंचित ठेवण्यासाठी खासगीकरण केले जात आहे. खासगीकरणात आरक्षणाला थारा नाही .सरकारी नोकऱ्यांमध्येही कंत्राटी नोकर भरतीमुळे नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे. सरकारच्या याच धोरणामुळे राज्यातील पाच लाख नोकऱ्या गेल्या आहेत. हे अधिकार टिकवण्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागेल.’
प्रा. विनय कांबळे म्हणाले, ‘मागासवर्गीयांच्या प्रश्नांचे स्वरुप बदलले आहे. ही स्थिती लक्षात घेऊन संघर्षाचे स्वरूप बदलावे लागेल. यासाठी व्यापक सामाजिक जागृतीची गरज आहे.’ राहुल ठाणेकर यांनी प्रास्ताविक केले, तर अशोक चोकाककर यांनी स्वागत केले. यावेळी आनंद राणे, रमेश रत्नाकर, आदी उपस्थित होते. प्रा. सिद्धार्थ मानकर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. ए. बी. कांबळे यांनी आभार मानले.
Comments are closed.