लातूर : बहुजननामा ऑनलाईन – मागासवर्गीयांसाठी देण्यात आलेल्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने बाभळगाव नाका चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, यामार्गावर ‘मातंग आरक्षण क्रांती मोटारसायकल महारॅली’ काढण्यात आली. लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या महारॅलीत शहरातील असंख्य समाजबांधवांनी सहभाग घेतला होता.
मागासवर्गीयांसाठी देण्यात आलेल्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्यात यावे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळास ५०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात यावे. संसद भवन व विधान भवन येथे क्रांतिवीर लहुजी साळवे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, आदी प्रमुख मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नागपूर ते मुंबई दरम्यान, मातंग आरक्षण क्रांती मोटारसायकल महारॅली आयोजित करण्यात आली आहे. ही महारॅली लातुरात दाखल झाली. या महारॅलीचे उद्घाटन केल्यानंतर बाभळगाव नाका चौक परिसरातून ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाली. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कसबे, प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे, राज्य प्रवक्ता दयानंद कांबळे, प्राचार्य डॉ. माधव गादेकर, जिल्हाध्यक्ष दशरथ सरवदे, युवराज जाधव, कैलास खंदारे, डॉ. दिलीप अर्जुने, सुरेश चव्हाण, सुनील सौदागर, विश्वजित गव्हाणे, अनंत दोरवे, महादू रसाळ, माया लोंढे, मछिंद्र अर्जुने, संतराम मोठेराव, शाहुराज शिंदे, शिवाजी लोेंढे, संजय देडे, कैलास खंदारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीत समाजबांधव व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.