पुणे बहुजननामा ऑनलाईन – पुण्यात मागील दहा दिवसात पडलेल्या पावसाएवढा पाऊस एकाच दिवशी कोसळण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारी दि. ८ ऑगस्ट रोजी पुण्यात सुमारे २०० मिली पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुख्यत: जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त असेल. असे सांगण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरात अतितीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तो पुर्व किनारपट्टीकडे सरकत असल्ये ओरिसा, पश्चिम बंगाल मार्गे तो विदर्भाच्या दिशेने पुढे येत आहे. म्हणून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात असलेल्या घाट परिसरात दोन दिवसात मुसळधार पाऊस पडणार आहे. तेथे एका दिवसात २०.५ सेंटीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे.
यामुळे वाढणार पाऊस ?
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या शाखा सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. तर त्याचवेळी पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव वाढला आहे. त्याचा थेट परिणाम मध्य महाराष्ट्रावर होत आहे. त्यामुळे या भागात पाऊस वाढेल. तर दक्षिण महाराष्ट्रापासून केरळपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुण्यातही पाऊस वाढणार आहे. त्यामुळे मान्सून ट्रफ दक्षिणेकडे सरकला आहे. त्यामुळे बुधवारी संध्याकाळपासून ते शुक्रवारी (दि. ९) दुपारपर्यंत पुणे आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. असे हवामान खात्याचे अधिकारी डॉ. कश्यपी यांनी सांगितले.