मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल ईडीने साडे 8 तास कोहिनूर मिलप्रकरणी कसून चौकशी केली. यानंतर आता मनसे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यात मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे यांच्यासह चौघांचा समावेश आहे. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरु आहे. ही यात्रा जळगावात पोचल्यानंतर त्यांना मनसे कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात येणार होते. पोलिसांनी आधीच या कार्यकर्त्यांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आहे. या जळगावातील मनसे विद्यार्थी सेनेचे ते जिल्हाध्यक्ष आणि इतर तिघांचा समावेश आहे.
सरकार विरुद्ध मनसे संघर्ष पेटणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोहिनूर मिलप्रकरणी काल(गुरुवार दि 22 ऑगस्ट) ईडीने तब्बल साडे 8 तास चौकशी केली. यानंतर जेव्हा राज ठाकरे कृष्णकुंजवर पोचले तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, “कितीही चौकशी केली तरी माझं तोंड बंद होणार नाही.” चौकशीनंतर त्यांचा आक्रमक अंदाज कायम असल्याचं पाहायला मिळालं. म्हणूनच कार्यकर्त्यांमध्येही पुन्हा उत्साह संचारला. त्यामुळे आगामी काळात मनसेसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.