मुंबई: बहुजननामा ऑनलाइन- इव्हीएम विरोधात सतत आवाज उठवणा-या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या जोडीला आता राष्ट्रवादीचे अजित पवार तर मनसेचे नेते राज ठाकरे एकत्र येणार आहेत. यासाठी त्यांनी मुहूर्त ठरवलाय क्रांती दिनाचा. येत्या 9 ऑगस्ट रोजी इव्हीएम विरोधात सर्व विरोधीपक्ष आणि संघटनां मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरु असल्याचे बोलले जात आहे.
विरोधकांच्या या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा येणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमविरोधी भूमिका आणखी तीव्र झाली आहे.विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी विरोधी पक्षांची आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधी भूमिका अनेकवेळा जाहीर बोलून दाखवली आहे. त्यामुळेच आता ईव्हीएमविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात राज ठाकरे,अजित पवार, प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज ठाकरे यांनी इव्हीएमच्या मुद्यावर केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. भेटीनंतर राज ठाकरेंनी थेट सोनिया गांधींचीही भेट घेतली होती. इव्हीएम विरोधात देशव्यापी आंदोलन उभे राहण्याची गरज असल्याची भूमिका त्यावेळी राज ठाकरे यांनी मांडली होती.