बहुजननामा ऑनलाइन टीम – पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पाचव्या ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ (Puneet Balan Group Women’s Premier League)अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत एचपी सुपरनोव्हाज्, सिम्हा वॉरीयर्स, ऑक्सिरिच स्मॅशर्स आणि लिजेंडस् पँथर्स या संघांनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत कर्णधार किरण नवगिरे हिच्या नाबाद ५१ धावांच्या जोरावर लिजेंडस् पँथर्स संघाने एचपी सुरनोव्हाज् संघाचा ७ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एचपी सुपरनोव्हाज् संघाने २० षटकात ४ गडी गमावून १२७ धावा जमविल्या. पुनम खेमनार हिने ४५ धावांची खेळी केली. सुशमा पाटील (२० धावा) व ऋतुजा गिलबिले (२१ धावा) यांनीही संघाच्या धावसंख्येला हातभार लावला. या आव्हानाचा पाठलाग करताना लिजेंडस् संघाच्या किरण नवगिरे हिने २७ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५१ चोपल्या. किरण हिला भुमिका उम्बरजे हिने ४२ धावा करून उत्तम साथ दिली. या दोघींनी तिसर्या गड्यासाठी ४४ चेंडूत ६१ धावांची भागिदारी करत लिजेंडस् पँथर्सला १८.१ षटकात विजय मिळवून दिला.
कर्णधार सायली लोणकर हिच्या दमदार खेळीच्या जोरावर सिम्हा वॉरीयर्स संघाने लिजेंडस् पँथर्स संघाचा ३ गडी राखून पराभव करत उपांत्य फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना लिजेंडस् पँथर्स संघाने २० षटकात ६ गडी गमावून ११८ धावा केल्या. गौतमी नाईक हिने नाबाद ५२ धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. गौतमीने ४४ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह आपली खेळी सजवली. सिम्हा संघाच्या दुर्वा मांडे (३-१७) हिने अचूक गोलंदाजी केली. हे आव्हान सिम्हा वॉरीयर्स संघाने १९.१ षटकात व ७ गडी गमावून पूर्ण केले. कर्णधार सायली लोणकर हिने २९ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह ४२ धावांची खेळी केली. साक्क्षी कानडी २३ व चरमय गवई १८ यांनी महत्वपूर्ण धावा करून संघाला विजय मिळवून दिला.
एचपी सुपरनोव्हाज्, सिम्हा वॉरीयर्स आणि ऑक्सिरिच स्मॅशर्स या संघांनी दोन विजय आणि ४ गुणांसह उपांत्य फेरी गाठली. लिजेंडस् पँथर्स संघाने एक विजय, २ गुण आणि उत्तम सरासरी धावगतीसह (०.०६४) उपांत्य फेरीत स्थान मिळवले.