पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मागिल वर्षभरापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. मागिल दीड महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढू लागल्याने हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक सैरभैर झाले आहेत. प्राणवायू रूग्णाचे जीव वाचवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. माजी विद्यार्थिनींनी समाजाची गरज ओळखून मदत केली, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे, असे मत साधना विद्यालायचे प्राचार्य विजय शितोळे यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या हडपसरमधील चंद्रभागा बाबुराव तुपे साधना कन्या विद्यालयातील १९९६ मधील दहावीच्या माजी विद्यार्थिनी मेडिकेअर हॉस्पिटलला 12 ऑक्सिजन सिलिंडर भेट दिले. याप्रसंगी साधना विद्यालयाचे प्राचार्य विजय शितोळे, प्राचार्या सुजाता कालेकर, दिलीप मोरे, डॉ. गणेश राख, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. विजय जोशी, १९९६ च्या दहावी बॅचच्या मनिषा राऊत-हिंगणे, वृषाली ढोणे-जाधव, मनीषा राऊत-अभंग, ॲड. धनश्री सोनवणे, अश्विनी खांडगे, माधुरी पाटील, स्मिता हिंगमिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
साधना कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर म्हणाल्या की, सामाजिक उपक्रमांमध्ये रयत शिक्षण संस्था आणि शाळांचे नेमहीच एक पाऊल पुढे आहे. माजी विद्यार्थिनींनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून हॉस्पिटलला केलेली मदत निश्चितच चांगली बाब आहे. कोरोना महामारीमुळे मागिल दोन महिन्यांपासून ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. सामान्य नागरिकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन मिळत नाही, अशी अवस्था आहे. रुग्णांचे हाल होत आहेत, त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांची घालमेल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाने सामान्यांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकून काम करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.