पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरातील खूनाचे सत्र सुरूच आहे. पुन्हा सहकारनगर भागात एका महिलेचा घरात शिरून हल्लेखोरांनी निर्दयीपणे खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. राहत्या घरात त्या रक्ताच्या थोराळयात आढळून आल्या आहेत. आरोपी अनोळखी असून, पोलीस प्रकरणाचा छडा लावत आहेत.
कल्पना घोष (वय 32)असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोष या धनकवडी परिसरात राहत होत्या. त्या एकट्याच या फ्लॅटवर राहत असल्याची माहिती आहे. त्या मूळच्या बंगाल येथील आहेत. दरम्यान आज सकाळी या इमारतीच्या रहिवाशांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कल्पना या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी धाव घेत पाहणी केली. तसेंच पथके तयारकरून तपासाच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, खून रात्री झाला असण्याची शक्यता आहे. तर खून चोरीच्या उद्देशाने झालेला नसावा असे दिसत आहे. खुनाचे कारण आणि आरोपी अज्ञात असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.