पुणे : बहुजननामा ऑनलाईन – बेरोजगारीला कंटाळून एकाने पत्नीचा गळा दाबून व एक वर्षाच्या मुलाचा गळा सुरीने चिरून खून करत स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील कदमवाकवस्तीत हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रज्ञा हनुमंत शिंदे (वय 28), मुलगा शिवतेज (वय 1 वर्ष) असे खून झालेल्या मायलेकाची नावे आहेत. तर हनुमंत शिंदे (वय 38) याने स्वतः खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत शिंदे हे सीमेंटच्या गादीवर चालक म्हणून काम करत होते. पण, गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे हे काम बंद झाले होते. ते कदमवाकवस्तीत कुटुंबासोबत राहत होते. हे काम बंद झाल्यानंतर कुटुंब चालवणे कठीण झाले होते. सध्या काही कामधंदाही नव्हता.
त्यामुळे ते गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगार होता. आर्थिक अडचण सुरू होती. त्यामुळे ते नैराश्यात होता. यातुनच रविवारी प्रथम पत्नी प्रज्ञा यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मुलाचा गळा सुरीने त्याचा खून केला. यानंतर स्वतः पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा सर्व प्रकार हनुमंत याचे वडील दुर्याप्पा शिंदे यांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक शेंडगे व पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेंडगे हे करत आहेत. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे.