बहुजननामा ऑनलाइन टीम – वाहन चोरट्यांच्या विरुद्ध धडक मोहीम हाती घेत हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने दोन वेगवेगळ्या कारवायात चोरीच्या(policeman’s son )तब्बल १८ लाख ९० हजाराच्या २५ महागड्या दुचाकी जप्त केल्या आहेत. यामध्ये बुलटे, केटीएम, आर.वन. फाईव्ह, पल्सर, स्पलेंडर अशा दुचाकींचा समावेश आहे. हडपसर, लोणीकाळभोर, यवत, आळंदी परिसरातून चोरट्यांनी ह्या दुचाकी चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी, कार्तिक प्रकाश भुजबळ (रा.लोणी काळभोर), योगेश नवनाथ वजाळे उर्फ टकल्या (रा. लोणी काळभोर), अभिषेक अनिल भंडगे (रा. गाडीतळ हडपसर), निलेश मधुकर आरते (रा. तुकाई दर्शन हडपसर), संजय हरीष भोसले (रा. मोरे बिल्डींग शेवाळवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पोलिसनामला सांगितले की आरते व भोसले या दोघांच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल व काडतुसे जप्त करण्यात आली आहे. याबात दोघांच्या विरुद्ध आर्म अॅक्टसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान हडपसर पोलिस ठाण्याचे एक पथक सहायक निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हद्दीत गस्तीवर होते. निलेश आरते व संजय भोसले दोघे दुचाकीवरून निघाले होते. मात्र, समोर पोलिस असल्याची चाहूल लागताच दोघांनी ग्लायडिंग सेंटरच्या बाजूला दुचाकी टाकून अंधारात पळ काढला. परंतू घटनेचे गांभिर्य ओळखत पोलिस उपनिरीक्षक सौरभ माने व पोलिस अंमलदार अकबर शेख या दोघांनी त्यांचा अंधारात पाठलाग करून मुसक्या आवळल्या. 10 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान दोघांकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांकडून १० महागड्या दुचाकी, गावठी कट्टा असा तब्बल १० लाख ७० हजाराच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
तसेच पोलिस नाईक नितीन मुंढे, हवालदार प्रताप गायकवाड, शशिकांत नाळे हे शनिवारी दुपारच्यावेळी शेवाळवाडी फाटा येथे वाहनांची तपासणी करत असताना, दुचाकीवरून तिघेजण वेगात येताना दिसले. संशय आल्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र तरी देखील त्यांनी जोरात दुचाकीचालवत पळ काढला होता. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले. दोघांकडे गाडीच्या कागदपत्राबाबात विचारणा केली तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कार्तिक, योगेश, अभिषेक या तिघांना पोलिस ठाण्यात आणून सविस्तर चौकशी केली तेव्हा त्यांनी दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीच्या ८ लाख २० हजार रुपये किंमतीच्या १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले.
ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ ५ चे उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक माने, अंमलदार प्रदीप सोनवणे,सैदोबा भोजराव,अकबर शेख, शाहिद शेख , प्रशांत दुधाळ यांच्या पथकाने केली.
कारागृहातून बाहेर येताच वाहन चोरी, खूनाच्या बदल्यासाठी बाळगले पिस्तूल
निलेश आरते हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खंडणी, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे ५ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका गुन्ह्यात तो १९ महिने येरवडा कारागृहात होता. मागील काही दिवसापुर्वी कारागृहातून बाहेर आला होता. बाहेर येताच त्याने परत महागड्या गाड्यांची चोरी करण्यास सुरूवात केली.
लॉकडाऊनमध्ये एका सराईताचा हडपसर परिसरात खून झाला होता. त्या खूनाचा बदला घेण्यासाठी आरते हा जवळ पिस्तूल बाळगून होता. मात्र पोलिसांच्या नजरेत आला अन् जाळ्यात अडकला. तसेच भोसले हा देखली सराईत गुन्हेगार असून, २० गुन्ह्याची त्याच्या नावावर नोंद आहे असे उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले .