Pune PMC News | कोरोना काळात न केलेल्या कामाच्या 1 कोटी रुपयांच्या बोगस बिल प्रकरण : महापालिका प्रशासनाची चोर सोडून संन्याशाला शिक्षा !

Pune PMC News | Bogus bill case of 1 crore rupees for work not done during Corona municipal administration!

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune PMC News | कोरोना (Coronavirus) काळात शहरातील स्मशानभूमींमध्ये देखभाल दुरूस्तीची कामे केल्याचे भासवून तब्बल एक कोटी रुपयांच्या बिलाची फाईल ‘पुटअप’ केल्याच्या प्रकरणाला आता नवीन वळण लागले आहे. याप्रकरणी संबधित ठेकेदारावर (PMC Contractor) गुन्हा दाखल होउन अटकही झाली होती. मात्र, दोन-तीन विभागांमध्ये विविध अधिकार्‍यांचे सही, शिक्के होउन अगदी शेवटच्या टप्प्यावर बिल खर्ची पडायच्या तांत्रिक टप्प्यांपर्यंत ही फाईल पोहोचली असताना यामध्ये प्रशासनातील कोणाचा तरी ‘हातभार’ असल्याचे सहज जाणवते. मात्र, खात्याअंतर्गत चौकशीमध्ये सर्वांनांच क्लिनचीट देउन ही फाईल इनवर्ड करून घेणार्‍या ‘बारनिशी क्लर्क’ च्या मागे विभागीय चौकशीचा ससेमिरा लावून प्रशासनाने यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. (Pune PMC News)

मे. आशय इंजिनिअर्स ऍन्ड असोसिएटने (Aashay Engineers And Associates) २०२१ मध्ये कोरोना काळात शहरातील चार स्मशानभूमीमध्ये देखभाल दुरूस्तीचे काम केल्याचे दाखवून एक कोटी रुपयांच्या बिलांसाठी फाईल दाखल केली होती. विशेष असे की या बिलांसाठी मुख्य लेखापाल कार्यालयाकडील बजेट कोड, ‘सा’, तेथील लिपिक, अधीक्षकांच्या स्वाक्षर्‍या होउन ती फाईल विद्युत विभागाकडे दाखल करण्यात आली. विशेष असे की ती फाईलवर विद्युत विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांपासूनच सर्वच अधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या होत्या. या विभागातील बारनिशी विभागाने (Barnishi Department) ऑनलाईन सिस्टिममधून ती फाईल आरोग्य विभागाला मार्क केली. मात्र, आरोग्य विभागाकडे गेल्यावर मे. आशय इंजिनिअर्स ऍन्ड असोसिएटने ज्या कामांसाठी बिलाची मागणी केली त्याचा बजेट कोड क्रमांक जुळत नसल्याचे तसेच ऑनलाईन सिस्टिममध्ये ती त्यांच्या विभागाकडे दिसत नसल्याचे निदर्शनास आले. यानंतर विद्युत विभागाने वरिष्ठांच्या आदेशानुसार संबधित कंपनीच्या संचालका विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यामध्ये त्याला अटक आणि नंतर जामिनावर सुटकाही झाली. महापालिका आयुक्तांनी (PMC Commissioner Pune) देखिल याप्रकरणी चौकशीसाठी उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली. (Pune PMC News)

 

या समितीने केलेल्या चौकशीमध्ये विद्युत विभागातील अधिकार्‍यांनी संबधित बिलांच्या कागदपत्र आणि निवेदनावरील स्वाक्षर्‍या त्यांच्या नसून बनावट असल्याचा खुलासा केला. विद्युत विभागाच्या बारनिशीमध्ये ज्यावेळी ही फाईल आली त्यावेळी बारनिशी क्लार्क तेथे नव्हता. त्याला निवडणूक विभागाकडे ड्युटी होती. त्यामुळे बारनिशीचे काम एका बिगारी महिलेकडे देण्यात आले होते. ती फाईल ऑनलाईन सिस्टिमध्ये अपलोड करताना तीला देखिल अडचण निर्माण झाली होती. हे या समितीच्या चौकशीमध्ये उघडकीस आले. या फाईलवरील स्वाक्षर्‍यांची तपासणी करण्याचे पत्र आणि सह्यांचे नमुने शिवाजीनगर पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यावरच स्वाक्षर्‍या बोगस असल्याचे स्पष्ट होणार आहे. पुढील काळात बारनिशीचे काम अनुभवी लिपिकाकडेच असावे, बिगार्‍यांकडे कामे सोपवू नयेत अशी देखिल शिफारस करत अहवाल अतिरिक्त आयुक्तांमार्फत आयुक्तांकडे सादर करण्यात आला.

समितीच्या अहवालात जवळपास सर्वांनाच क्लिनचीट दिली असताना वरिष्ठांनी मात्र फाईल न तपासताच दाखल करून घेतल्याबाबत ‘बारनिशी क्लार्क’ची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष असे की ही फाईल दाखल झाली होती, त्या दिवशी संबधित क्लार्क हा निवडणुकीच्या ड्युटीसाठी बाहेर असल्याचे पत्र महापालिकेच्या निवडणूक विभागाने दिले आहे. स्वाक्षर्‍या बनावट आहेत की खर्‍या याबाबत न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडून अद्याप अहवाल आलेला नाही. असे असताना केवळ विभागीय चौकशी गुंडाळण्यासाठी बारनिशी क्लार्कचा बकरा बनवून हे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सर्व घटनाक्रमातून दिसून येत आहे.

बारनिशी क्लर्कचे काम काय?

महापालिकेच्या प्रत्येक विभागामध्ये बाननिशी क्लर्कची नियुक्ती करण्यात येते. संबधित विभागाकडे येणारे प्रत्येक पत्र, फाईल स्वीकारून तिची रजिस्टरमध्ये तारीख, वार आणि वेळेसह नोंद करणे. संबधित पत्र अथवा फाईल ज्या अधिकारी, कर्मचारी अथवा विभागाला मार्क आले आहे, त्याविभागाकडे पाठवुन त्याची जावक रजिस्टरमध्ये नोंद करणे, संबधित अधिकारी, कर्मचारी याच्याकडे ते पत्र अथवा फाईल पोहोचवल्यानंतर संबधितांची जावक रजिस्टरवर स्वाक्षरी घेणे. तसेच ऑनलाईन सिस्टिममध्येही नोंद करणे, हे त्या क्लर्कचे काम आहे. फाईल तपासणे, स्वाक्षर्‍या तपासण्या, बजेट हेड तपासणे, जाहिरातींची खातरजमा करणे यापैकी कुठलेही काम हे त्या क्लर्कचे नसून संबधित अधिकार्‍याचे अथवा विभाग प्रमुखाचे असते.

Web Title : Pune PMC News | Bogus bill case of 1 crore rupees for work not done during Corona municipal administration!