पुणे : बहुजननामा ऑनलाइन – सॅंडल घेऊन देण्याच्या बहाण्याने नऊ वर्षाच्या मुलाशी अनैसर्गिक संभोग करणाऱ्या १९ वर्षीय तरूणाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश ए.व्ही.रोट्टे यांनी हा निकाल दिला.
अब्दुल रहेमान युनुस सैय्यद (वय १९, रा. पिंपरी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पीडित मुलाच्या आजोबाने याबाबत पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ऍड. सुनील हांडे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. पीडित मुलाची साक्ष आणि वैद्यकीय पुरावा यामध्ये महत्त्वाचा ठरला. तीन फेब्रुवारी २०१३ रोजी पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घटना. सैय्यद पीडित मुलाला मित्राने कोणत्या दुकानातून सॅंडल घेतला, हे दाखविण्यासाठी घेऊन गेला. त्याला नवीन सॅंडल घेऊन देण्याच्या बहाण्याने दुकानाच्या आतील बाजूस असलेल्या खोलीमध्ये नेवून त्याच्याबरोबर अनैसर्गिक संभोग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. गुन्ह्याचे गांभीर्य पाहुन अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ॲड. सुनील हांडे यांनी केली. त्यानुसार भारतीय दंड संहिता ३७७ (अनैसर्गिक कृत्य) नुसार १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड, कलम ३४२ नुसार (अन्यायाने कैदेत ठेवणे) सहा महिने सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंड आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम चार नुसार दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.
दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. दंड भरल्यास ती रक्कम पीडित मुलाला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.