बहुजननामा ऑनलाइन टीम – पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पाचव्या ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत भुमिका उम्बरजे आणि किरण नवगिरे यांनी फटकावलेल्या धावांच्या जोरावर लिजेंडस् पँथर्स संघाने एचपी सुपरनोव्हाज् या संघाचा ४ गडी राखून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुंढवा येथील लिजेंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत एचपी सुपरनोव्हाज् संघाने अव्वल गुणस्थान प्राप्त करत तर, लिजेंडस् पँथर्सने उत्तम सरासरी धावगतीच्या जोरावर उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. आज नाणेफेक जिंकून एचपी सुपरनोव्हाजने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २० षटकात ७ गडी गमावून १२४ धावांचे आव्हान उभे केले. एचपी सुपरनोव्हाज् संघाचा कोणताही फलंदाज आज मोठी खेळी करू शकला नाही. सुशमा पाटील (२१ धावा), मानसी तिवारी (१९ धावा), कर्णधार पुनम खेमनार (१८ धावा) आणि प्रियंका घोडके (१७ धावा) यांनी छोट्या पण उपयुक्त खेळी करत संघाला १२० धावांचा टप्पा पार करून दिला. लिजेंडस् संघाच्या शरयु कुलकर्णी (१-१५), भुमिका उम्बरजे (१-१६) यांच्यासह सर्वच गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी केली.
लिजेंडस् पँथर्सने आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी सुरूवात केली. भुमिका उम्बरजे आणि श्रावणी देसाई (६ धावा) या दोघींनी ४८ चेंडूत ४१ धावा करून लिजेंडस् संघाला चांगली सलामी मिळवून दिली. भुमिका उम्बरजे हिने ५३ चेंडूत ६ चौकारांसह ५१ धावांची खेळी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. मध्यावरती लिजेंडस् संघाची धावगती संथ झाली. यावेळी कर्णधार किरण नवगिरे हिने डावाची सुत्रे आपल्याकडे घेतली आणि केवळ २० चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ४२ धावा फटकावल्या. सामन्यामध्ये १७ व्या षटकानंतर ३० धावा आणि १८ चेंडू असे समीकरण होते. एचपी संघाच्या प्रियंका घोडके हिने टाकलेल्या १८ व्या षटकात किरण नवगिरे हिने ३ चौकार व १ षटकारांसह १८ धावा वसूल केल्या.
अखेरच्या दोन षटकांमध्ये १२ धावांची आवश्यकता होती. एचपी सुपरनोव्हाज्च्या पुनम खेमनार हिने १९ वे षटक निर्धाव टाकून एक गडी बाद केला आणि सामना आपल्या संघाकडे झुकविला. अखेरच्या षटकात लिजेंडस् संघासाठी १२ धावा व ६ गडी बाद असे समीकरण होते. एचपी संघाच्या सुशमा पाटील हिने २० व्या निर्णायक षटकामध्ये गोलंदाजी केली. षटकाचा पहिलाच चेंडू नो बॉल पडला. फ्रि हिटवर लिजेंडस्ची कर्णधार किरण हिने षटकार वसूल केला. दुसर्या चेंडूवर २ धावा काढल्या. ४ चेंडू आणि ३ धावा असे समीकरण झाले. त्यानंतर एचपीच्या सुशमाने ३ चेंडू निर्धाव टाकले आणि सामन्यात रंगत आणली. एका चेंडूमध्ये ३ धावा असे समीकरण असताना, अखेरच्या चेंडूवर किरण हिने षटकार खेचत लिजेंडस् संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी हा किताब भुमिका उम्बरजे हिला मिळाला.