पुणे : बहुजननामा ऑनलाईन – 2024 च्या निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित लढलो तर इतिहास घडवू. भाजप 30-20 जागेच्या पुढे जिंकू शकत नाही. पदवीधरमध्ये आम्ही आमची ताकद दाखवली आहे, असे मत राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालापमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांचा 80वा वाढदिवस पक्षाद्वारे वेगळ्या पद्धतीने साजरा करणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. 36 जिल्हे व 350 तालुक्यांमध्ये शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करणार आहे. यात सर्व पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. यात वेबसाइटचे उद्घाटन तथा डिजिटल टेक्नॉलॉजीचा उपयोग करून online मेंबर शिप वेबसाइटचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते मेंबर शिप पावती फाडून केले जाणार आहे.
त्याचप्रमाणे आदिवासी भागाला 1 लाख मेडिकल किट वाटप करण्यात येणार आहेत. 13-20 डिसेंबरदरम्यान रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. अडचणीच्या ठिकाणी या रक्ताचा पुरवठा करण्यात येणार आहे. शरद पवार हे डिजिटल रॅलीद्वारे प्रबोधन करणार आहेत, असे जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.