पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शिवजयंती निमित्त लाल महालाजवळ शिवाजी महाराज यांचा गौरवशाली पोवाडा सांगणाऱ्या शाहीर हेमंतराजे मावळे यांचा पुणे पोलिसांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. दरम्यान आज कोव्हीडमुळे कार्यक्रमाना मनाई केली होती. पण तरीही शाहीर मावळे हे येथे येत निषेध व्यक्त करत असताना त्यांना फरासखाना पोलिसांनी गाडीत बसवून ठाण्यात नेले होते.
राज्यात आज शिवजयंती उत्स्फूर्तपणे साजरी झाली. पण कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई केली होती. परंतु तरीही पुण्यातील लाल महालासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास सांगणारा पोवाडा कार्यक्रम साजरा करणासाठी शाहीर हेमंतराजे मावळे यांना करायचा होता.
त्यानिमित्ताने त्यांनी शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारा पोवाडा कार्यक्रम सादर करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी शाहीर हेमंत मावळे यांनी राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली होती. परंतु शाहीरांच्या या पत्राला राज्य सरकारने उत्तर दिले नाही. त्याचा निषेध करण्यासाठी शाहीर हेमंतराजे मावळे यांनी लाल महालासमोर आज पोवाडा गायचे ठरवले होते. ठरल्यानुसार आज त्यांनी लाल महाला समोर काही साथीदारांसह पोवाडा सादरही केला. हा पोवाडा ऐकण्यासाठी शिवभक्तांची गर्दी ही त्याठिकाणी जमली होती..
मात्र, कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कुठेही कार्यक्रम किंवा शोभायात्रेला यात्रेला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी शाहीर हेमंतराजे मावळे यांना कार्यक्रम थांबविण्याची विनंती केली. परंतु गर्दी वाढतच गेल्याने पोलिसांना शाहीर मावळे यांना स्वतःच्या गाडीत बसवून फरासखाना पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर लाल महाला समोरील गर्दी हळूहळू कमी झाली. पोलिसांनीही त्यानंतर शाहीर हेमंतराजे मावळे यांची पुष्पगुच्छ देऊन सत्कार केली आणि त्यांना घरी पाठवले.