नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत विद्यूत ऊर्जेचा इंधनाला चांगला पर्याय असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. तसेच देशातील सरकारी अधिकाऱ्यांसाठी आणि मंत्र्यासाठी इलेक्ट्रिक वाहन द्यावेत अशी सूचना गडकरी यांनी केली. केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी आपल्या वीज विभागातील अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहन अनिवार्य करावे, असा आग्रहही त्यांनी धरला.
याशिवाय आपल्या विभागातील अधिकाऱ्यांसाठी देखील अशाप्रकारचे पाऊल उचलू अशी घोषणा गडकरी यांनी यावेळी केली. केंद्रीय मंत्री गडकरी शुक्रवारी (दि. 19) गो इलेक्ट्रिक कार्यक्रमात बोलत होते. एकट्या दिल्लीत 10 हजार इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग करण्यात आला तर दर महिन्याला 30 कोटी रुपयांची बचत होईल, असे गडकरी म्हणाले.
सरकार गरिबांना स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरसाठी सबसिडी देते. त्याऐवजी विजेवर चालणारे उकरण ज्या उपकरणांद्वारे स्वयंपाक बनवला जातो अशा उपकरणांवर सबसिडी द्यावी, अशी सूचना गडकरी यांनी केली. विशेष म्हणजे विजेच्या उपकरणांवर अतिशय स्वच्छता राखत स्वयंपाक करता येतो, असेही ते म्हणाले. दरम्यान, आर. के सिंह यांनी यावेळी दिल्ली-आगरा आणि दिल्ली-जयपूर या मार्गावर ‘फ्यूल सेल’ बस सुरु केली जाणार असल्याची घोषणा केली.