पुणे : बहुजननामा ऑनलाइन – दहशत माजवणाऱ्या भाईंची रवानगी कारागृहात केल्यानंतर अवैध धंदेवाल्यांना देखील पोलीस आयुक्तांनी हिसका दाखवला. आता चोऱ्या माऱ्या करणाऱ्या टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी बिरजूसिंग रजपूतसिंग दुधाणी (वय ३७), बिंतूसिंग शामसिंग कल्याणी (वय २४, दोघे रा. रामटेकडी, हडपसर), सनीसिंग पापासिंग दुधाणी (वय २९,रा. बिरादारनगर, हडपसर) यांच्यासह साथीदारावर मोक्का लावण्यात आला आहे. दुधाणी व कल्याणी गे अटकेत आहेत.
शहर व जिल्ह्यात या दुधाणी टोळीवर घरफोडी, जबरी चोऱ्या व लूटमार असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. गेल्या वर्षी ( दि. २८ डिसेंबर) या टोळीने औंध येथील सोसायटीत रखवालदाराला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून घरफोडी केली होती. दुधाणी टोळीने घरफोडीचे गुन्हे करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केली. या टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शेवाळे यांनी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तवाची छाननी करून त्यांनी पुढील कारवाईसाठी हा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी देण्यात आली. सहाय्यक आयुक्त किशोर जाधव तपास करत आहेत.