पुणे : बहुजननामा ऑनलाइन- सत्ताधारी भाजपने सभागृहनेता बदलल्यानंतर अन्य पदाधिकारी बदलणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतू महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनाच पुढे कंटीन्यू करण्यावर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने शिक्कामोर्तब केल्याने या पदांसाठी इच्छुक थंड पडल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
पुणे महापालिकेमध्ये २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सत्तेत आलेल्या भाजपने महापौर, सभागृहनेता आणि स्थायी समिती अध्यक्षपदावर पक्षातील सिनियर नगरसेवकांना संधी दिली. पहिल्या अडीच वर्षांसाठी उपमहापौरपद हे मित्र पक्ष असलेल्या रिपाइंला देण्यात आले होते. मात्र वर्षभरापुर्वी हे पद भाजपने घेतले. दरम्यान, नुकतेच सभागृहनेते पदी स्वीकृत असले तरी प्रशासकिय अनुभव आणि इतर पक्षांशी समन्वयाचा अनुभव असलेल्या गणेश बिडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिडकर यांच्या नियुक्तीसोबतच महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्या ऐवजी अन्य नगरसेवकांना संधी देण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. विशेषत: इच्छुकांनी आपली वर्णी लागावी यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर फिल्डिंगही लावली होती.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुका वर्षभरावर आल्या आहेत. सध्या राज्यातही पक्ष विरोधी बाकावर आहे. मागील निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करणारे काही मोठे प्रकल्पांचे अंतिम टप्प्यात भूमिपूजन होणार आहे. तर काही प्रकल्पांची कामे पुर्ण होणार आहेत. कोरोनामुळे चालू वर्षात या कामांमध्ये फारशी प्रगती होउ शकलेली नाही. पुढील उर्वरीत कालावधीत अधिकाअधिक प्रकल्प गतीने पुर्ण करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा अजेंडा भाजपच्या वरिष्ठ पातळीवर निश्चित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृहनेता अशी भक्कम टीम कायम ठेवण्यावर वरिष्ठांचे एकमत झाले आहे. त्यामुळे तूर्तास तरी महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष ही पदे बदलण्यात येणार नाहीत, अशी माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.