बहुजननामा ऑनलाइन टीम – लोणी काळभोर येथील एका विवाहीतेने आपल्या नऊ महिन्यांच्या मुलीसह (Girl) रेल्वेखाली (Train) झोकून देत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (दि.14) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुणे-दौंड रेल्वेलाईनवर लोणी काळभोर(woman commits suicide ) कॉर्नरजवळ घडली.
शितल देवराम मखवाने (वय-22) आणि शुभ्रा मखवाने (वय 9 महिने) असे आत्महत्या केलेल्या मायलेकीची नावे आहेत. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान या प्रकरणी शितलचे मामा विजय रामचंद्र साळुंखे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुणे-दौंड रेल्वेलाईनवर शितल व शुभ्रा या दोघींचे मृतदेह लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रामा कृषी रसायन लिमिटेड या कंपनीजवळ आढळुन आले. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी दोघींचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर व त्यांचे सहकारी करत आहेत.