बहुजननामा ऑनलाइन टीम – बाणेर येथील स.नं. ११० मध्ये महापालिकेच्यावतीने ऍमेनिटी स्पेसवर उभारण्यात आलेल्या महिला बचत भवनची इमारत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डला कार्यालयीन वापरासाठी भाडेकराराने देण्याचा प्रस्ताव महापालिका(Mahila Bachat Bhavan) आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समितीपुढे ठेवला आहे.
बाणेर येथील स.नं. ११० मध्ये ७४२ चौ.मी. क्षेत्र ऍमेनिटी स्पेस म्हणून मार्च २०१२ मध्ये महापालिकेच्या ताब्यात आले आहे. महापालिकेने याठिकाणी पार्किंगसह दोन मजल्यांचे बांधकाम केले आहे. पहिल्या आणि दुसर्या मजल्यावर अनुक्रमे ३३३.१६ चौ.मी.चे दोन हॉल असून महिला बचत भवनच्या उद्देशाने ही इमारत विकसित करण्यात आली आहे. भारत सरकारच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने त्यांच्या कार्यालयीन वापरासाठी या इमारतीची भाडेतत्वावर मागणी केलेली आहे. या इमरतीचे प्रतिमहा भाडे ९१ हजार ७१२ रुपये इतके होत आहे.
महापालिकेच्या जागा वाटप नियमावली नुसार कोणत्याही जागेचा विनियोग विस्तापित मागणी आणि केंद्र अथवा राज्य शासनाची कार्यालये अथवा अंगीकृत उपक्रम यांना जाहिर निविदा न मागविता देण्याची तरतूद आहे. त्यानुसार बाणेर येथील स.नं. ११० येथील महिला बचत भवन येथील पहिला व दुसर्या मजल्यावरील हॉल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाला २०२० च्या रेडीरेकनर नुसार भाडे आकारून १५ वर्षासाठी देण्यात यावा, असा प्रस्ताव महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समिती पुढे ठेवला आहे.