पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कातील सिद्धीकी याच्या खुन प्रकरणात निर्दोष सुटका झाल्यानंतर मध्यवस्तीतील कार्यक्रमाला हजेरी लावत केलेले शक्तीप्रदर्शनाबाबत गॅंगस्टर शरद मोहोळ व त्याच्या साथीदारांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला व त्याच्या साथीदारांना न्यायालयाने 5 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
शरद हिरामण मोहोळ (वय 38), विश्वास बाजीराव मनेरे (वय 37), मनोज चंद्रकांत पवार (वय 42) स्वप्निल अरुण नाईक (वय 35) योगेश भालचंद्र (वय 40) अशी जामीन मंजूर झालेल्याची नावे आहेत. तर अक्षय भालेराव, सिताराम खाडे, दिनेश भिलारे, मंगेश धुमाळ यांच्यासह दहा ते बारा जणांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
दहशतवादी कातील सिद्धीकी याचा कारागृहात खून केल्याप्रकरणी शरद मोहोळ याची नुकतीच निर्देश सुटका झाली. यानंतर तो कारागृहाबाहेर आला. त्यानंतर शरद मोहोळ हा मध्यवस्तीत आयोजित एका संघटनेच्या पुरस्कार कार्यक्रमात आला. त्याला याठिकाणी एक पुरस्कार देण्यात आला होता. 26 जानेवारी रोजी हा कार्यक्रम खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला होता. पण या कार्यक्रमाला गॅंगस्टर शरद मोहोळ आणि त्याचे दहा ते बारा साथीदार त्या ठिकाणी आले. तर त्यांनी Covid-19 अनुषंगाने जमाबंदी आदेश असतानाही बेकायदेशीर गर्दी जमवून आरडाओरडा करत गुरुवार पेठेत दहशत निर्माण केली. तसेच, त्यांचा आरडाओरडा व गोंधळ यामुळे नागरिक घाबरून पळाले, असे पोलिसांच्या फिर्यादीत म्हंटले होते.
याप्रकरणी शरद मोहोळ व त्याच्या 5 साथीदारांना अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या वतीने वकिलांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने ती अमान्य करत न्यायालयीन कोठडी सुनावली. शरद मोहोळ याच्या वकिलांनी लागलीच जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना जामीन मिळाला.