पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पेट्रोल पंपावरील कामगाराची ५ हजार ७०० रुपयांची रोकड चोरुन नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना एका डिलीव्हरी बॉय व कामगारांनी पकडले. कोरेगाव पार्कमधील रोशनी पेट्रोल पंपावर ही घटना रविवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
माजिद अकबर शेख (वय १९, रा. येरवडा) व वृषभ बाबा पिसे (वय २०, रा. कामराजनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शांताराम सोनने (वय २५, रा. संतोषनगर कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम डिलीव्हरी बॉय असून काल दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ते रोशनी पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले होते. त्यावेळी एक चोरटा कामगाराशी झटापट करुन रक्कम चोरण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने रक्कम चोरल्यानंतर चोरटा पळून जात असताना शांतारामने पाठलाग करुन त्याला पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चौकशीनंतर त्याच्या दुसऱ्या साथीदारालाही पोलिसांनी अटक केली. त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. उपनिरीक्षक रुपेश चाळके तपास करीत आहेत.