बहुजननामा ऑनलाईन – बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केले. त्याच्याकडून गावठी कट्टा व काडतुसे असा २० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
मुनाफ रियाज पठाण (वय २३, रा. नानापेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेला गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी नाना पेठेतील एका मंदीरामागे सराईत थांबला असून त्याच्याकडे गावठी कट्टा आणि काडतुसे असल्याची माहिती पोलीस नाईक साहिल शेख यांना मिळाली. त्यानुसार खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने परिसरात सापळा रचला. त्यावेळी तेथे उभा असलेला मुनाफ कमरेला हात लावत असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडे गावठी कट्टा आणि काडतुसे मिळून २० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
ही कामरिगी पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते, उदय काळभोर, साहिल शेख, प्रमोद टिळेकर यांच्या पथकाने केली.