पुणे : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून तीन हजारांच्यावर आढळून येत आहे. पुणे शहरात रुग्ण संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आज (मंगळवार) दिलेल्या आकडेवारीमुळे दिलासा मिळाला आहे. आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. पुण्यात गेल्या 24 तासात 3226 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 3268 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 64 हजार 885 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 27 रुग्ण शहरातील आहेत तर 8 रुग्ण शहरा बाहेरील आहेत. आतापर्यंत 5 हजार 270 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 3 हजार 268 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 26 हजार 809 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (मंगळवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 13 हजार 436 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 32 हजार 806 इतकी आहे. त्यापैकी 725 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 5 लाख 19 हजार 600 रुग्णांपैकी 4 लाख 50 हजार 893 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 58 हजार 926 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 781 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.88 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 86.78 टक्के आहे.