पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरातील हॉटस्पॉट ठरलेले काही भाग 1 मे पासून 3 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. यामध्ये समर्थ पोलीस स्टेशन, खडक पोलिस स्टेशन आणि फरासखाना या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील संपूर्ण भाग आणि स्वारगेट, लष्कर, बंडगार्डन, सहकारनगर, दत्तवाडी, येरवडा आणि खडकी या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील काही भाग यांचा समावेश असल्याचे शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हॉटस्पॉटमधील 10 पोलिस ठाण्यांच्या अंर्तगत दूध विक्रीची दुकाने सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत उघडी राहणार आहेत.
घरपोच वितरणासाठी सकाळी सहा ते दहा या वेळेत परवानगी असेल. या भागातील जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश पोलिसांनी दिला आहे. 1 ते 3 मे दरम्यान हे निर्बंध लागू राहणार आहेत. शिधापत्रिकेवरील अन्नधान्य वितरणासाठी आणि वैद्यकीय उपचारांसाठी, औषध दुकानांसाठी हे निर्बंध लागू राहणार नाहीत, असेही पोलिसांनी म्हटले आहे. एक मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते 3 मे रोजी रात्री १२ पर्यंत हे निर्बंध असतील, असे पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय आदेशात म्हटले आहे. उर्वरित पुण्यात शहर पोलिसांच्या पूर्वीच्या आदेशानुसार दुकाने १० ते दुपारी २ दरम्यान सुरू राहणार आहेत. हॉटस्पॉटमधील किराणा माल,भाजीपाला आणि फळे, चिकन, मटन, अंडी आदी विक्री केंद्र, दुकाने तसेच इतर वितरण सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. पुण्यातील भवानी पेठ, येरवडा, घोले रस्ता, येरवडा आणि कसबा क्षेत्रीया कार्यालय येथे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे.
या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या अखत्यारितील प्रभागांवर महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी सध्या युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या क्षेत्रीय कार्यालयांच्या अंर्तगत येणाऱया भागावर लक्ष ठेवण्यासाठी दहा पोलिस ठाण्यांसाठी सुधारित आदेश बजावण्यात आला आहे. शहरात कोरोनाचे सध्या १४३२ रुग्ण असून आत्तापर्यंत ८६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २३० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. पुण्यात ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. या पार्श्वभूमीवर पुणे आणि मुंबईतील परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी केंद्र सरकारने दोन पथके दोन्ही शहरांत पाठविली होती. त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला विविध सूचना केल्या आहेत. पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी राज्य सरकारने महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी चार विशेष अधिकारीही नियुक्त केले आहेत.
तरीही सध्या पुण्यातील रुग्णांची संख्या नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे पुण्यात हॉटस्पॉट ठरलेल्या भागांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. आणि त्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात येत आहे.
जाणून घेऊया पुण्यातील हॉटस्पॉट परिसर –
समर्थ, खडक आणि फरासखाना पोलिस ठाण्याच्या अखत्यारित येत असलेला संपूर्ण परिसर.
स्वारगेट पोलिस ठाणे – गुलटेकडी, महर्षीनगर, डायसप्लॉट, इंदिरानगर, खड्डा झोपडपट्टी परिसर
लष्कर पोलिस ठाणे- नवीन मोदीखाना, पूना कॉलेज रस्ता, मोदीखाना कुरेशी मशिदीजवळचा परिसर, भीमपुरा गल्ली, बाबाजान दर्गा, क्वार्टरगेट रस्ता, शिवाजी मार्केट, सरबतवाला चौक रस्ता, शितळादेवी मंदिर रस्ता आणि परिसर
बंडगार्डन पोलिस ठाणे – ताडीवाला रस्ता परिसर
सहकारनगर पोलिस ठाणे – तळजाई वसाहत, बालाजीनगर परिसर
दत्तवाडी पोलिस ठाणे – पर्वती दर्शन परिसर
येरवडा पोलिस ठाणे – लक्ष्मीनगर, गाडीतळ, चित्राचौक परिसर
खडकी पोलिस ठाणे पाटील इस्टेट झोपडपट्टी, इराणी वस्ती पाटकर प्लॉट परिसर
प्रशासन पुण्यातील वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या पाहून परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे.
एनपी न्यूज24 नेटवर्क