पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनाचे 630 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून कोरोनामुळं पुणे शहरातील 22 जणांचा आज मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 18 जणांचा आज दिवसभरात पुणे शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 3830 जणांचा मृत्यू झाला आहे. आजची समाधानाची बाब म्हणजे दिवसभरात 1010 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 54 हजार 230 वर पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 37 हजार 502 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 12 हजार 898 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी 858 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 453 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येतं आहे.