पुणे : बहुजननामा ऑनलाईन – देशात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पुण्यात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असून आज दिवसभरात 2342 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुणे महानगरपालिकेने आज पासून जंम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरु केले आहे.
पुणे महापालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात शहरामध्ये 11 हजार 890 स्वॅब नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 2342 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 37 हजार 736 इतकी झाली आहे. शहरात रुग्ण संख्या वाढत असताना कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 15 रुग्ण शहरातील तर 2 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे 5 हजार 068 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्या वाढत असताना शहरामध्ये अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या शहरामध्ये 23 हजार 062 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्यापैकी 524 क्रिटिकल असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 1789 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 2 लाख 9 हजार 606 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन करावा लागेल. लॉकडाऊन टाळायचे असेल तर नियम पाळावेच लागतील, असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.