पुणे : बहुजननामा ऑनलाइन – अॅपद्वारे मित्राचे मोबाइल बिल भरणाऱ्या तरुणाला सायबर चोरट्याने 77 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खात्यातून ऑनलाइन पध्दतीने पैसे ट्रान्सफर केले गेले.
याप्रकरणी 28 वर्षीय तरुणाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात आयटी ऍक्ट व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण पर्वती दर्शन परिसरात राहण्यास आहे. चार महिन्यांपूर्वी ( दि. 19 मार्च) फिर्यादी तरुणाला त्याच्या मित्राने मोबाइल बिल ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याची विनंती केली. त्यानंतर तरुणाने ३९९ रुपये जमा केले. मात्र, मोबाइल रिचार्ज न झाले नाही. पैसे परत करण्यासाठी मोबाइल कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राच्या नावे असलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा ग्राहक संरक्षण केंद्रातून बोलत असल्याची बतावणी करणाऱ्या चोरट्याने युवकाला ‘एनी डेस्क’नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्यानंतर डेबिट कार्डची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर चोरट्याने बँक खात्यातून 77 हजार रुपये स्वत:च्या खात्यात जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे तपास करत आहेत. चोरट्याने संकेतस्थळावर असलेल्या मोबाइल कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राच्या नावे असलेल्या मोबाइल क्रमांकात काही बदल केले असून चोरट्याने संकेतस्थळावर स्वत:चा मोबाइल क्रमांक टाकल्याचा संशय आहे.