पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मधुमेह, ताप व कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्यानंतर तुमच्यामुळेच पेशंट व्हेंटिलेटरवर गेला, असे म्हणत डॉक्टरांना मारहाण करणार्या चौघांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. हा प्रकार इनामदार रुग्णालयात कोविड १९ सेंटरच्या जवळ २५ मार्च रोजी घडली होता.
असिफ कादीर शेख (वय 33), जैद जुनेद घोडके (वय 20), अफाक अफताब फराश (वय 22) आणि अंजिक्य दत्तात्रय भांगे (वय 28, सर्व रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ. सुहेल खान (वय ३७, रा. कोंढवा) यांनी वानवडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान यांचे कोंढव्यात सना हॉस्पिटल आहे. त्यांचा नेहमीचा ३८ वर्षाचा रुग्ण आजारी असल्याने पंधरा दिवसांपूर्वी (दि. १३ मार्च) रुग्णालयात आणले होते. तो गोळ्या घेऊन गेला. डॉक्टर खान यांनी त्याला कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला. पण त्याने चाचणी केली नाही. दुसर्या दिवशी तो पुन्हा रुग्णालयात आला. यावेळी मात्र त्याला खूप ताप होता. तसेच ब्लड शुगरही वाढली होती. त्यामुळे त्यांनी त्याला दाखल करुन घेतले. तसेच कोरोना चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली. त्या अनुशंगाने त्याच्यावर उपचार सुरु होते. (दि.२१ मार्च) त्याला इनामदार रुग्णालयात बेड मिळाल्याने तेथे हलविण्यात आले. रुग्णाची काहीही माहिती मिळत नाही. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे, इतकीच माहिती रुग्णालय देत, असे सांगत रुग्णांच्या नातेवाईकांनी फिर्यादी खान यांना इनामदार रुग्णालयात येण्याची विनंती केली. त्यानुसार (दि २५ मार्च) रात्री साडे दहा वाजता डॉक्टर खान नातेवाईकांबरोबर इनामदार रुग्णालयात आले. त्यांनी रुग्णाची घेतली. डॉक्टरांकडून प्रकृतीची माहिती घेतली. त्याची फाईल पाहिली. त्यानुसार त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत होती. खाली येऊन त्यांनी ही माहिती नातेवाईकांना दिली. यावेळी असिफ शेख व त्याचे तीन मित्र आले. तसेच तुमच्यामुळे आमचा पेशंट व्हेंटिलेटरवर गेला असे म्हणत येथील डॉक्टरांच्या मामाला मारहाण केली. तर डॉक्टर खान यांनाही हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. वानवडी पोलिसांनी असिफ शेख सह त्याच्या मित्रांना अटक केली असल्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले.