पुणे : बहुजननामा ऑनलाईन – जामीनावर बाहेर आलेल्या गुन्हेगाराचे ‘डांगडिंग’ करत फटाके वाजवून स्वागत करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. शिवणे येथील राहुलनगर बस थांब्यासमोर मंगळवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
सागर राजेंद्र गौड (वय 19), आकाश सिब्बन गौड (वय 19), सागर भालेराव वारकरी (वय 21), अविनाश रामप्रताप गुप्ता (वय 20) आणि सुरेंद्र राजेंद्र गौड (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याशिवाय अभिषेक गुप्ता व त्याच्या सहा ते सात साथीदारांवर उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक संतोष नागरे यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी उत्तम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आकाश गौड, अविनाश गुप्ता, सागर वारकरी आणि सागर गौड यांना अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. यानंतर येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. दरम्यान मंगळवारी कोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले होते. मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास वारकरी आणि इतर आरोपींच्या स्वागतासाठी त्यांचे साथीदार राहुल नगर येथील बस थांब्यावर एकत्र जमले होते. हे चौघेही त्या ठिकाणी आल्यानंतर जोरजोरात ओरडत घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी केली. तर यावेळी येथे जमा झालेल्या नागरिकांना आरोपींनी शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाच जणांना पकडले. तर इतर पसार होण्यात यशस्वी झाले.अधिक तपास उत्तमनगर पोलीस करीत आहेत.