पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भरधाव दुचाकीचे अचानक ब्रेक दाबल्यानंतर पाठीमागे बसलेल्या महिलेचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खडकी रेल्वे स्टेशनच्या जवळ हा अपघात झाला आहे.
मंगल शंकर मदने (वय 59, रा. पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बाळू रामचंद्र करडे (वय 56) याच्यावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक प्रदीप न्यायानीत यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल मदने या आरोपी बाळू यांच्या मित्राच्या पत्नी आहेत. त्यांना त्यांचा मित्र शंकर मदने यांनी पत्नीला ट्रेझरी ऑफिसमध्ये घेऊन जा असे सांगितले होते. मंगल यांचे ट्रेझरी ऑफीसमध्ये काही काम होते. त्यामुळे त्यांना जायचे होते. त्यासाठी त्यांना घेऊन बाळू हे त्यांच्या दुचाकीवर जात होते. काम संपवून परत तर घरी जात होते. दरम्यान पुणे मुंबई रोडने खडकी मार्गे ते काम संपवून परत घरी जात असताना अचानक खडकी रेल्वे स्टेशनच्या पुढे बोपोडीजवळ आल्यानंतर रुळावर समोर दुचाकी आल्याने त्यांनी भरधाव दुचाकीचे ब्रेक दाबले. यामुळे मंगल या खाली पडल्या आणि त्या बेशुद्ध झाल्या. यावेळी बाळू यांनी त्यांना लागलीच प्रथम येथील खडकी कॅन्टोमेंट रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले. यामुळे बाळू यांनी मंगल यांच्या मुलाला बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर रुग्णालयाकडून पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी खडकी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी धाव घेत माहिती घेऊन गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.