दोंडाईचा: बहुजननामा ऑनलाईन – दोंडाईचा येथील पोलीस हवालदाराला 18 हजाराची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. एसीबीने मंगळवारी (दि. 25) रात्री दहाच्या सुमारास पोलीस ठाण्यातच ही कारवाई केली. त्याच्या विरोधात दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
विजय शंकरराव मोरे (वय 50) असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, रामी येथील तक्रारदार योगेश संतोष कोळी व त्याचा नातेवाईक विरूद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल न करता ब वर्गात समरी पाठवावी, या साठी 20 हजार द्यावेत, अशी मागणी आरोपी मोरे यांनी केली होती. तडजोडीनंतर 18 हजार देण्याचे ठरले होते. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीने सापळा रचून मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास पोलीस ठाण्याच्या मागील रिकाम्या खोलीत 18 हजाराची लाच स्विकारताना पोलीस हवालदार विजय मोरे यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी त्याच्यावर दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.