बहुजननामा ऑनलाइन टीम – नवले ब्रिजजवळ(Pune) पुन्हा एकदा एका ट्रकचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाल्याची घटना सकाळी घडली आहे. सुदैवाने यात जीवित हानी झालेली नसून, चार वाहनांचे नुकसान झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वीच माल (Pune)वाहतूक ट्रकचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला होता. त्यात एकाच जागीच मृत्यू झाला होता. तर 9 जण जखमी झाले होते.
पोलिसांनी ट्रकचालक चित्रपाल जनरलसिंग (वय 29, रा. मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक घेऊन चित्रपाल हा नवले पूलकडून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी हॉटेल विश्वासमोर आल्यानंतर अचानक भरधाव ट्रक बंद पडला आणि त्याचे ब्रेक फेल झाले. यावेळी चालकाने समोरील एका रिक्षाला आणि तीन कारला धडक दिली. यात वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळच्या वेळी अपघात झाल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र वाहतूक पोलीस व सिंहगड रोड पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली. यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. किरकोळ मार लागला असून, वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.
दरम्यान, कात्रजकडून नवले ब्रिजकडे येताना अनेकवेळा अपघात होत आहेत. वाहनांची संख्या मोठी असते. त्यात उताराचा रस्ता असल्याने वाहनांचा वेग मोठा असतो. त्यात माल वाहतूक वाहने मोठ्या प्रमाणात असतात. त्यातून एखाद्या जरी चालकाचे दुर्लक्ष झाले तरी येथे भीषण अपघात घडतो.