बहुजननामा ऑनलाइन टीम – शहरातून तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पथकांनी बेकायदेशीर पिस्तुल बाळगताना शिवाजीनगर भागात पकडले (Crime Branch )आहे. त्याच्याकडून 2 पिस्तुल आणि 4 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान तडीपार गुन्हेगार शहरात येऊन बिंदास पिस्तुल घेऊन फिरत असल्याचे दिसत आहे.
जयेश विजय लोखंडे (वय 20, रा. 224 मंगळवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयेश लोखंडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर वाहन जाळपोळ, आर्म ऍक्टसह एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. दरम्यान त्याला फरासखाना पोलिसांनी ऑगस्ट 2020 मध्ये दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार केले होते. त्यानंतर देखील तो शहरात आला आहे.
शहरात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान युनिट एकचे कर्मचारी सचिन जाधव यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की, मंगला टॉकीजच्या येथे एकजण पिस्तुल घेऊन येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सुनील ताकवले, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, कर्मचारी सचिन जाधव, इम्रान शेख, महेश बामगुडे, तुषार माळवदकर यांच्या पथकाने त्याला सापळा रचून पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 2 गावठी पिस्तुल आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्याने पिस्तुल कोठून आणि कशासाठी आणले याचा तपास करण्यात येत आहे.