बहुजननामा ऑनलाईन – कोरोना कालावधीतही आंदोलन करणार्या विरोधकांना लाज वाटली पाहिजे. ही वेळ आंदोलन करण्याची नसून एकमेकांना सहकार्याची आहे. त्यामुळे विरोधकांनी पीपीई कीट घालून वॉर्डात जावे असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. कोल्हापूरात आर्सेनिक एल्बम गोळ्या वाटपासह जिल्हा परिषद सदस्यांना टॅब वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
महाविकासआघाडीचे सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. तरी देखील विरोधक आंदोलने करत आहेत. मात्र ही वेळ आंदोलनाची आणि टीका टिप्पणीची नसून सरकारला सहकार्य करण्याची आहे. कोरोनाची गंभीर परिस्थिती उद्भवली असताना आंदोलन करणार्या विरोधकांना लाज वाटली पाहिजे. आंदोलने करून बिळात लपून बसण्यापेक्षा एखादे वेळी कोरोना वॉर्डात पीपीई कीट घालून विरोधकांनी जाऊन यावे असा टोलाही त्यांनी लगावला. आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या दोन रुपयांना देऊ म्हणणार्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्या गोळ्या दोन रुपयांना का दिल्या नाही? असा सवालही मुश्रीफ यांनी उपस्थित केला. तसेच, आमदार चंद्रकांत पाटील नेहमीच चुकीची विधानं करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.