बहुजननामा ऑनलाईन – मोची समाजातील कार्यकर्त्यांची रविवारी भगतसिंग मार्केट येथील आधार केंद्रामध्ये बैठक घेण्यात आली. यामध्ये मोची समाजाने निवडणुकीविषयी घेतलेल्या भूमिकेच्या चर्चा करण्यात आल्या. याच दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर मध्य मतदारसंघाबाबत मोची आणि मुस्लिम समाजबांधवानी आमच्या समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी करत आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष विरोध दर्शविला आहे. यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी सभागृहनेते देवेंद्र भंडारे, बाबा करगुळे, नागनाथ कासलोलकर, बसवराज म्हेत्रे, दिनेश म्हेत्रे, सिद्राम कामाठी, सिद्राम अट्टेलूर, यल्लाप्पा तुपदोळकर, मारूती माळगे, सिद्राम बावडेकर आदी उपस्थित होते.
आ. प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविल्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दोन्ही समाजांनी घेतलेल्या भूमिकेमुळे विचलित झालेल्या आ. शिंदे यांनी मोची समाजाला समजावणे सुरु केले आहे. त्या म्हणाल्या की, कॉंग्रेस पक्ष हा सर्व जाती-धर्मांना घेऊन जाणारा पक्ष आहे. त्या पक्षात सर्व नागरिकांना महत्व दिले जाते. सध्या कॉंग्रेस अडचणीत आहे. मोची समाजाने नेहमीप्रमाणे यंदाही त्यांच्या पाठीशी रहावे. या बैठकीमध्ये मोची समाजाच्यावतीने काही प्रतिनिधींनी समाजाच्या वेगवेगळ्या मागण्याही मांडल्या.
बैठकीतील कार्यकर्त्याने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, आ. प्रणिती शिंदे यांनी जरी मोची समाजाच्या बैठकीत सहकार्य करण्याचे आवाहन केले असले तरी येत्या १५ दिवसात पुन्हा बैठक घेऊन सर्व समाजबांधवाच्या एकमताने कोणत्या पक्षाला साथ द्यायची यावर चर्चा होणार आहे.