आज एच ए मैदानावर वंचित बहुजन आघाडीचे महाअधिवेशन
पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – जातीयवादी भाजप शिवसेना सरकारला सत्तेतून खाली ओढून बहुजनांच्या हाती सत्तेच्या चाव्या देण्यासाठी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीने राज्यातील राजकारणात आपले स्थान निर्माण केल्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये प्रकाश आंबेडकर यांची तोफ आज धडाडणार आहे. आजचे महाअधिवेशन पिंपरीतील राजकारणात वंचित बहुजन आघाडी महत्त्वाची भुमिका बजावणार आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या महाअधिवेशनाकडे लागलेले आहे.
‘हार्ट ऑफ सिटी’ अशी ओळख असलेल्या या ग्राऊंडवर राजकीय सभा घेणे हे मोठे आव्हान समजले जाते. ऑक्टोबर २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पिंपरी विधानसभा मतदार संघात येत असलेले हे ग्राऊंड व येथे झालेली मोदींची सभा मात्र भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे यांना विजय प्राप्त करून देऊ शकली नव्हती. भव्य दिव्य कार्यक्रम व सर्वोच्च पद असलेल्या राजकीय नेत्यांच्या सभांसाठी या ग्राऊंडचा आजपर्यंत वापर केला गेला आहे. २०१६ ला झालेल्या ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याच मैदानावर झाले होते.
वंचित बहुजन आघाडीसाठीच्या सभेसाठी पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे यांनी जाणिवपूर्वक निवडले आहे. केवळ आंबेडकरी समाजच नव्हे तर बहुजन समाजातील उपेक्षित अशा सर्वच वर्गांना या सभेचे कुतूहल आहे. २९ ऑगस्ट २०१८ रोजी ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी एमआयएम पक्षासोबत जाण्याची घोषणा केली आणि केवळ राज्याचे नव्हे, तर देशभर त्याचे पडसाद उमटले. प्रकाश आंबेडकर यांची तत्वनिष्ठ भूमिका व दलितोत्तर राजकारणाचा पाया रचण्याचा अजेंडा व धडपड देशभर चर्चिली गेली आहे. त्यातच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते थेट नातू असणे व उच्चशिक्षित असणे कायमच आंबेडकरी व बहुजनांच्या हृदयसिंहासनावर ठसत गेले आहे. उद्या होणारी त्यांची सभा राज्यातील दहावी सभा असणार आहे. यापूर्वी सोलापूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर, सातारा, कल्याण येथील सभांनी गर्दीचे विक्रम मोडले आहे. ही सभा पिंपरी चिंचवडमध्ये व्हावी यासाठी इंजि. देवेंद्र तायडे हे खूप आग्रही होते. देशपातळीवर गेल्या पाचवर्षात पुण्यानंतर पिंपरी चिंचवडला आलेले महत्त्व कायमच लक्षवेधी ठरले गेले आहे. उद्योग, मोठ-मोठे कारखाने, शैक्षणिक संस्था, सक्षम महापालिका, आयटी इंडस्ट्री, मेट्रोच्या जाळ्याची सुरुवात यामुळे पिंपरी-चिंचवडचे स्वतंत्र अस्तित्व ठसठसितपणे जगासमोर आले आहे.
या सभेसाठी ८० फूट बाय ४० फूट इतका मोठा स्टेज उभारला गेला आहे. साऊंडसिस्टिम, लाईट, इलेक्ट्रॉनिक मिडियासाठी ओबीव्हॅनची व्यवस्था, निमंत्रित व्यक्तींसाठी २ हजार खुर्च्या, तसेच इतरांसाठी बसण्यास भव्य लाल रंगाची मॅट अंथरण्यात आली आहे. सोशल मिडियातील फेसबूक, सॅटेलाईट यंत्रणा, तसेच छोटी-मोठी व्हिडिओ न्यूज चॅनेल यांना थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे. तर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त या सभेसाठी ठेवला आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, आमदार बळीराम शिरमकर, अंजली आंबेडकर, माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने, माजी आमदार विजय मोरे, माजी आमदार हरिदास भदे, भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ सोनोने उपस्थित राहणार आहेत.
इंजि. देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वाखाली महासचिव सुहास देशमुख, के.एम. कांबळे, सेक्रेटरी रवी शिंदे, संघटक जगन्नाथ कांबळे, महिला आघाडी प्रमख लता रोकडे, रमाई महिला मंचच्या अध्यक्षा भिमाताई तुळवे व शेकडो कार्यकर्ते या सभेच्या संयोजनसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून झटत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील एच. ए. मैदानावर बहुजन वंचित आघाडीचे महाअधिवेशन आज पार पडणार आहे. त्यासाठी शहरभर आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मागील एक महिन्यापासून जय्यत तयारी सुरु केली आहे. दलित, ओबीसी, मुस्लीम यांच्या बैठका, त्यांना पत्रके वाटणे, होर्डींग्ज या माध्यमातून महाअधिवेशनाची वातावरणनिर्मिती केली जात होती. बहुजन वंचित आघाडीच्या या महाअधिवेशनासाठी पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर जनसमूदाय येणार आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त लोकांना महाअधिवेशनाला आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. बहुजन, ओबीसी, मुस्लीम यांच्यासोबत इतर जाती धर्माच्या लोकांनाही आकर्षित केले जात आहे. आजच्या सभेला साधारण दोन लाख लोक येण्याची शक्यता आहे.