महोबा : वृत्तसंस्था – एका २० वर्षीय तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशमधील महोबा जिल्ह्यातून समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी मोबाईल फोनवरही हे दुष्कृत्य रेकॉर्ड केले असून ते व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.
गौरव, विकास, पुष्पराज आणि सौरभ असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी १९ ते २१ वर्ष वयोगटातील असून, पॉलिटेक्निकचे विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. २१-२२ मार्च रोजी ही घटना घडली आहे. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी बुधवारी (दि. २४) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की मंगळवारी रात्री आरोपींनी तिच्या घरी प्रवेश केला. त्यावेळी ती घरात एकटी होती. त्यांनी तिचे अपहरण केले आणि नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
याप्रकरणी फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार करण्यास संपर्क साधल्यास गॅंगरेपचा व्हिडिओ व्हायरल करण्याची आरोपीने धमकी दिली. गुन्ह्यानंतर आरोपी महिलेला बेशुद्ध अवस्थेत सोडून पसार झाले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजेंद्रकुमार गौतम यांनी सांगितले, की चारही आरोपींना अटक केली आहे. चौघेही पॉलिटेक्निक विद्यार्थी असून, परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होते.