मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे सरकार आले तर पोलिसांची ड्युटी 8 तासांची करू तसेच होमगार्ड्सना पोलीस सेवेत सामावून घेऊ असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. सोमवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सोमवारी प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. पोलिसांच्या 8 तासांच्या ड्युटीचा विषय वंचितच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आला आहे. पोलिसांकडे सर्वच सरकारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. याशिवाय राज्यातील 50 हजार होमगार्ड्सना पोलीस सेवेत समाविष्ट केले जाईल असेही जाहीरनाम्यात म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्व 288 जागा लढवेल. काँग्रेससोबत आघाडीसाठी आम्ही तयार आहोत. त्यांना 144 जागांचा प्रस्तावही दिला आहे. परंतु तेच आघाडीसाठी पुढे येत नाही. तपासयंत्रणेच्या दबावाखाली आलेले काँग्रेस नेते आघाडी करून भाजपला विरोध करायचा सोडून वंचितला बदनाम करत आहेत.” असा आरोपही आंबेडकरांनी केला.
आम आदमी पक्षासोबत विधानसभेसाठी आघाडीची बोलणी सुरु आहे असे ते म्हणाले. याशिवाय वंचितचे सांगलीतील नेते गोपीचंद पडळकर हे शेतकरी कामगार पक्षात जाणार या अफवा आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय एमआयएमदेखील विधानसभेला वंचित सोबत असेल असेही आंबेडकर म्हणाले.