पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. मुंबई, नागपूर, पुणे या प्रमुख शहरांसह इतर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. पुणे शहरात आणि जिल्ह्यात मागिल काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1187 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 1187 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजार 552 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 846 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्य़ंत 1 लाख 10 हजार 404 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 1883 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 11 रुग्ण शहरातील आहेत. तर 5 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2730 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 1923 तर हद्दीबाहेरील 807 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण चिंचवड, चिखली, दिघी, देहूरोड, मोशी, पिंपरी, पिंपळे निलख, भोसरी, नेहरुनगर, जुन्नर, आंबेगाव, चाकण येथील रहिवाशी आहेत.