बहुजननामा ऑनलाईन – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ प्रकरणी आणि मनसुख हिरने मृत्यू प्रकरण (Mansukh Hiren Death Case) मुळं एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक झाली आहे. सध्या एटीएस (ATS) या प्रकरणाचा तपास करत आहे. आता या प्रकरणातील अहमदाबाद कनेक्शन समोर आल्यानंतर एटीएसची टीम तपासासाठी गुजरातमधील अहमदाबाद मध्ये पोहोचली आहे.
मनसुख हिरेन प्रकरणी मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेला पोलीस विनायक शिंदे (51) आणि बुकी असलेला नरेश गोर (31) यांना महाराष्ट्र एटीएसनं अटक केली आहे. क्रिकेट बुकी असणाऱ्या नरेश गोरनं गुन्ह्यासाठी 5 बेनामी सिम कार्ड मुख्य आरोपी सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांना उपलब्ध करून दिले असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. तसंच मनसुख हिरेन यांचा मोबाईल 4 मार्चपर्यंत सुरू होता. बुकी नरेश यानं पुरवलेली बेनामी सिमकार्ड गुजरातमधील असल्यानं मनसुख हिरेन प्रकरणाचं अहमदाबाद कनेक्शन समोर आलं आहे. मनसुख हिरेन प्रकरणात एकूण 14 सिम कार्ड पुरवणाऱ्या गुजरातमधील व्यक्तीला एटीएसनं ताब्यात घेतलं आहे आणि त्याची कसून चौकशीही सुरू आहे.
एटीएसनं अहमदाबादमधील तपासादरम्यान 8 सिम कार्ड जप्त केले आहेत. बुकी नरेश गोर यानं दिलेल्या 5 सिम कार्डपैकी एक सिम कार्ड हत्या करणाऱ्याला दिलं होतं. 4 मार्च रोजी सकाळी 8.20 वाजता मनसुख यांना WhatsApp कॉल केला होता. विनायक शिंदेनं मनसुख यांना कांदिवली क्राईम युनिटचा पोलीस तावडे आहे असं सांगत शेवटचा कॉल करून घोडबंदर येथे बोलावलं होतं असं एटीएसच्या तपासात उघड झालं आहे.