नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीमध्ये दोषपुर्ण इव्हीएम वापरले गेले तसेच प्रत्यक्ष मतदान आणि मोजणीनंतरचे मतदान यामध्ये तफावत असल्याचा आरोप करत विदर्भातील ७ खासदारांच्या खासदारकीला आव्हान देण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये ही निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे.
काय आहेत आक्षेप ?
लोकसभा निवडणूकीदरम्यान वापरण्यात आलेल्या ईव्हीएम दोषपुर्ण आहेत. त्यामुळेच एकूण मतदान आणि मतमोजणीमध्ये तफावत दिसून येते. या फरकाचा फायदा मोठ्या प्रमाणात विजयी उमेदवारांना मिळाला आहे. असा आक्षेप घेत थेट उच्च न्यायालयात त्यांच्या निवडीला आव्हान देण्यात आले आहे.
कोणत्या खासदारांविरोधात याचिका ?
भाजपकडून निवडून आलेले नितीन गडकरी, अशोक नेते, सुनील मेंढे, रामदास तडस, शिवसेनेकडून निवडून आलेले कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव, व काँग्रेसचे बाळू धानोरकर या खासदारांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
कोणी केली दाखल केली याचिका ?
नागपूर
नितीन गडकरी यांच्याविरोधात कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले आणि वंचित बहुजन आघाडीचे मनोहर डबरासे हे पराभूत झाले होते. नितीन गडकरी यांच्याविरोधात नाना पटोलेंसह तिघांनी याचिका दाखल केली आहे.
रामटेक
रामटेक मतदारसंघात कृपाल तुमाने आणि किशोर गजभिये यांच्यात लढत झाली होती. त्यात तुमाने विजयी झाले. त्यांच्या निवडीला गजभिये यांनी आव्हान दिले आहे.
चंद्रपुर-वणी
चंद्रपूर वणी मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि कॉंग्रेसचे बाळू धानोरकर आणि राजेंद्र महाडोळे यांच्यात लढत झाली. त्या कॉंग्रेसचे बाळू धानोरकर यांचा विजय झाला. त्यांच्या निवडीविरोधात वंचितचे राजेंद्र महाडोळे यांनी याचिका दाखल केले आहे.
गडचिरोली चिमूर
गडचिरोली चिमूर मतदारसंघातून विद्यमान खासदार अशोक नेते यांचा विजय झाला. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे उमेदवार नामदेव उसेंडी रिंगणात होते.
भंडारा – गोंदीया
भंडारा गोंदीया मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे तर आघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे होते. त्यात सुनील मेंढे विजयी झाले.
वर्धा
वर्धा मतदारसंघात कॉंग्रेसच्या चारूलता टोकस आणि भाजपचे खासदार रामदास तडस रिंगणात होते. त्यात रामदास तडस यांचा विजय झाला.
तसेच बुलढाणा मतदारसंघातून प्रतापराव जाधव यांचा विजय झाला. विदर्भातील या सर्व खासदारांच्या निवडीविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. आता यावर न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणे गरजेचे आहे.